*अपघातात मयत झालेल्या पोलीस कॅान्स्टेबलच्या कुटुंबियांना सहकाऱ्यांनी दिला आर्थिक आधार !*

नंदुरबार पोलीस पुन्हा एकदा चर्चेत! नंदुरबार पोलीस दलातील चालक पोलीस अंमलदार निलेश पावरा वय ३० यांचे दि.२०/११/२०२१ रोजी रात्री मोटरसायकलने घरी जात असताना अपघाती निधन झाले. निलेश पावरा यांना त्याआधी ४ दिवसांपूर्वीच पुत्ररत्न झाले होते. आपले नवजात मुलास पहाण्यास जात असताना हा अपघात झाला होता. निलेश यांच्या आदिवासी कुटुंबाची घरची परिस्थिती पाहून नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपल्या मयत झालेल्या पोलीस बांधवासाठी प्रत्येकी ५००/- रु वर्गणी काढण्याचे आवाहन केले व स्वतः १००००/- रु. दिले.पोलीस अधीक्षकांच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यांतील सर्व १३०० पोलीस अधिकारी व अंमलदार पुढे आले व त्यांनी सुमारे ६ लाख ५३ हजार रुपये जमा केले. नवजात बालकाचे नामकरण होऊन त्या बालकाला पावरा कुटुंबीयांचे वतीने वारस म्हणून जाहिर केल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॅा.बी.जी.शेखर पाटील यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्याचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी या जमा केलेल्या रकमेचा चेक निलेश पावरा यांच्या पत्नीच्या हाती सुपूर्द केला. यावेळी तेथील वातावरण भावनिक झाले होते.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक डॅा.बी.जी.शेखर यांनी पोलीस अधीक्षकांच्या संकल्पेनेचे जाहीर कौतुक केले.आपल्या बांधवांच्या मृत्यूनंतर कुटुंबाकडे पहाण्याच्या नंदुरबार पोलीसांच्या माणुसकीच्या दृष्टीची महाराष्ट्र पोलीस दलात चर्चा आहे. नुकतेच एका ७५ वर्षे वृद्धास त्याचे चोरीस गेलेले पैसे वर्गणी काढून परत केल्याबद्दल नंदुरबार पोलीस जोरदार चर्चेत आले होते.आता आपल्या बांधवांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाकडे पहाण्याच्या नंदुरबार पोलीसांच्या माणुसकीच्या दृष्टीची व त्यांच्या कॅप्टनची महाराष्ट्र पोलीस
दलात पुन्हा एकदा चर्चा आहे.

टिप्पण्या